१० वी, १२ वीच्या परीक्षा संपल्या. त्यामुळे आता निकाल लागेपर्यंत विद्यार्थ्यांची वाटचाल सुरु झाली ती पुढील करियर शोधण्याची. परीक्षा तर संपल्या पण आता पुढे कोणते करियर क्षेत्र निवडावे हा एक मोठ्ठा प्रश्नच सर्व विद्यार्थ्यांपुढे निर्माण झालेला दिसतो. आणि त्यातच सध्या करियर क्षेत्राच्या निर्माण झालेल्या असंख्य वाटा पाहून, तसेच मित्रांनी, नातलगांनी आणि इतर जवळच्या लोकांनी दिलेले सल्ले ऐकून तर विद्यार्थी मोठ्या धर्मसंकटातच पडलेले दिसतात. त्यामुळे तुमचा हा करियर शोधण्याचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आज तुम्हाला असे अॅप्स सांगणार आहोत, जे तुम्हाला योग्य आणि पसंतीचे करियर निवडण्यासाठी मदत करतील. चला तर मग पाहूया कोणते आहेत हे अॅप्स...
Dream Big Careers
ह्या अॅपच्या मदतीने विद्यार्थ्यांना शालेय तसेच महाविद्यालयातील विषयांप्रमाणे ज्याची अधिक आवड आहे, त्याप्रमाणे करियर शोधू शकतात. तसेच येथे तुम्हाला त्या ठराविक करियरसंबंधी सविस्तर माहिती, त्यासाठी काय पात्रता लागते, तसेच करियरसंबंधीचे कोर्सेस, क्लासेस, कॉलेजेस कोणती ह्याबाबतही सविस्तर माहिती मिळते.
Shiksha Ask & Answer
ह्या अॅपच्या माध्यमातून तुम्ही CAT, GATE, JEE Main, GRE, GMAT, SAT, CEED, CLAT ह्या आणि ह्यासारख्या अनेक महत्त्वपुर्ण परिक्षांमध्ये यशस्वी झालेले टॉपर्स तसेच त्यातील तज्ज्ञांना तुमचे प्रश्न विचारु शकता. तसेच बीबीए, एलएलबी, बी.टेक, एमबीए,एमएस, एमबीबीएस ह्यांसारख्या अनेक कोर्सेसविषयी सविस्तर माहिती शोधू शकता. त्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार, प्रोफाईलनुसार योग्य तो कोर्स निवडू शकता. तुमच्या आवडीच्या कोर्ससाठी उत्कृष्ट कॉलेजेस, प्लेसमेंट, फॅकल्टी तसेच तेथील फी ह्याविषयी तुम्ही त्या संबंधित कॉलेजेसमध्ये असणा-या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारु शकता.
करियर काउंसिलर
हा अॅप नुकतीच १० वीच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी खूपच उपयोगी आणि महत्त्वाचा आहे. ह्यात विद्यार्थ्यांना लवकरच होणा-या पदवी आणि उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील परीक्षा, त्यासाठी लागणारा अभ्यास, त्यांचे निकाल, ऑनलाइन काउन्सिलिंग ह्याविषयी माहिती मिळते. तसेच तुम्ही नोकरीसाठी तुमचा बायोडेटा संबंधित कंपनीला पाठवू शकता.
करियर गाइड
हा अॅप विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि सल्लागार ह्या सर्वांसाठी फायद्याचा आहे. ह्यात २०० पेक्षा अधिक करियर पर्याय आहेत. तसेच तुमची शाळा किंवा कॉलेज संपल्यानंतर तुम्हाला पगार, कामाचे तास, कॉलेजेस, प्लेसमेंट विषयी माहितीही मिळते. तसेच तुम्ही पाहत असलेल्या करियर क्षेत्राची लाइफस्टाइल, तेथील काम करण्याची पद्धत कशी आहे ह्याविषयीही येथे सविस्तर माहिती मिळते.