Vodafone Idea कंपनीने अलीकडेच आपल्या वापरकर्त्यांसाठी 5G सेवा सुरू केली आहे. लक्षात घ्या की, सध्या भारतातील केवळ दोन सर्कल्समध्ये ही सर्व्हिस लाईव्ह करण्यात आली आहे. म्हणजेच भारतात केवळ दिल्ली आणि पुणे शहरात तुम्ही VI च्या 5G सेवेचा लाभ घेऊ शकता. एवढेच नाही तर, कंपनीने आता दिल्ली आणि पुण्याच्या वापरकर्त्यांसाठी 5G प्लॅन्सही जाहीर केले आहेत.
Vodafone Idea ने दोन नवे 5G प्लॅन्स लाँच केले आहेत. या दोन प्लॅनपैकी एक प्लॅन प्रीपेड यूजर्ससाठी आहे, तर दुसरा प्लॅन पोस्टपेड यूजर्ससाठी सादर करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे VI वापरकर्त्यांना 5G नेटवर्कसाठी त्यांचे सिम अपग्रेड करावे लागणार नाही. म्हणजेच Jio आणि Airtel प्रमाणे VI देखील वापरकर्त्यांना विद्यमान 4G सिमवर 5G सुविधा उपलब्ध करून देत आहे.
प्रीपेड वापरकर्त्यांना 475 रुपयांच्या रिचार्जमध्ये 5G नेटवर्क मिळेल. हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये यूजर्सना दररोज 4GB डेटाची सुविधा मिळते. तसेच, यात अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 मोफत SMS ची सुविधा देखील आहे. एवढेच नाही तर, यामध्ये युजर्सना 5GB अतिरिक्त डेटा देखील मिळेल, जो 3 दिवसांसाठी वैध असतो.
दुसरीकडे, पोस्टपेड ग्राहकांना 1101 रुपयांचा REDX प्लॅन ऍक्टिव्ह करावा लागेल. सध्या कंपनी या दोन्ही प्लॅन्स अंतर्गत वापरकर्त्यांना अमर्यादित 5G सेवा देईल की नाही, हे अद्याप स्पष्ट केलेले नाही.
लक्षात घ्या की, कंपनीने सध्या भारतातील फक्त दोन सर्कल्समध्ये 5G सेवा लाईव्ह केली आहे. अशा परिस्थितीत, 5G मध्ये ऍक्सेस करण्यासाठी तुमचा VI नंबर या दोन्ही शहरांमध्ये नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.