भारतातील जवळपास प्रत्येक स्मार्टफोन युजर स्पॅम कॉल आणि स्पॅम SMS पासून त्रस्त आहेत. यामुळे अनेक युजर्सचे नुकसान देखील झाले आहे. त्यामुळे, स्पॅम कॉलच्या वाढत्या घटना पाहता ट्रायने अनेक वेळा टेलिकॉम कंपन्यांना इशारे देखील दिले आहेत. त्यामुळे आघाडीची टेलिकॉम दिग्गज भारती Airtel कंपनीने याबाबत पहिले पाऊल उचलले आहे.
होय, Airtel ने आपल्या ग्राहकांना स्पॅम कॉल्सपासून मुक्त होण्यासाठी एक नवीन AI सेवा सुरू केली आहे. कंपनीने भारतातील पहिली ‘Airtel AI Spam Detection’ नेटवर्क आधारित स्पॅम शोध प्रणाली जारी केली आहे, जी रिअल टाइम स्पॅम कॉल आणि मॅसेजेस डिटेक्ट करेल. जाणून घेऊयात सर्व तपशील-
Airtel ने आज 25 सप्टेंबर रोजी आपल्या ग्राहकांसाठी नवीन AI स्पॅम डिटेक्शन सेवा लाँच केली आहे. ही सेवा वापरकर्त्यांना स्पॅम कॉल्स आणि संदेशांबद्दल रिअल टाइम माहिती देईल. ही नवीन सेवा ड्युअल लेयर प्रोटेक्शन म्हणून तयार करण्यात आली आहे, ज्यामध्ये तुम्हाला दोन फिल्टर्स मिळतील, अशी माहिती कंपनीने दिली आहे. यात नेटवर्क लेयर आणि दुसरी आयटी सिस्टम लेयर आहे.
सर्व कॉल्स आणि मेसेज या ड्युअल लेयर AI सिस्टममधून जातात. या सिस्टममध्ये दररोज 1.5 अब्ज कॉल्स 2 मिलीसेकंदमध्ये प्रोसेस केले जातात, असे कंपनीने सांगितले आहे. केवळ स्पॅम कॉल किंवा मॅसेजेसच नाही तर, ही टेक्नॉलॉजी वापरकर्त्यांना SMS द्वारे मिळालेल्या स्पॅम लिंक्सबद्दल देखील सतर्क करेल. महत्त्वाचे लक्षात घ्या की, Airtel ची ही नवीन AI सर्व्हिस पूर्णपणे मोफत आहे. यासाठी तुम्हाला वेगळे पैसे द्यावे लागणार नाहीत.
एअरटेलची ही नवीन सेवा आल्यानंतर Truecaller सारख्या ॲप्सवर याचा जबरदस्त परिणाम होईल, असे चित्र दिसत आहे. तुमची टेलिकॉम कंपनी तुम्हाला फसव्या कॉल्स आणि मेसेजबद्दल सतर्क करणार आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तो कॉल आणि मेसेज सहजरित्या ब्लॉक देखील करू शकता.