चेन्नई गेल्या काही दिवसांपासून पूराच्या विळख्यात अडकली आहे. त्यामुळे त्यांना एक मदतीचा हात म्हणून दूरसंचार कंपनी एअरटेलने चेन्नईतील पूरग्रस्त ग्राहकांसाठी विशेष योजना आणली आहे, ज्यात किमान ३० रुपयाचा बॅलेंस टाकण्यात येणार आहे. एअरटेलसह दूरसंचार कंपनी वोडाफोननेसुद्धा पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
ह्या योजनेबाबत एअरटेलने अशी माहिती दिली आहे की, वीज गेल्याचा त्यांच्या सेवांवरसुद्धा परिणाम झाला आहे. त्यामुळे कंपनी स्थानिक संस्थासह काम करत आहे.
त्यांनी असेही सांगितले की, चेन्नईत झालेल्या अवकाळी पावसामुळे येथीन जनजीवन विस्कळीत झाले आहे, त्यामुळे येथील नागरिकांना घरातून बाहेर पडणेही अवघड झाले आहे. अशातच एअरटेलने आपल्या ग्राहकांना त्यांच्या प्रियजनांशी संपर्क करण्यासाठी ही सुविधा आणली आहे.
तर दूरसंचार कंपनी वोडाफोनने ह्याविषयी माहिती देताना म्हणाले की, ते आपल्या प्रीपेड ग्राहकांना १० रुपयाचा किमान बॅलेंस देणार आहे. त्याचबरोबर वोडाफोन टू वोडाफोन कॉलसाठी १० मिनिटांचा टॉकटाईम मोफत मिळेल.
तसेच सर्व ग्राहक मोफत 100MB इंटरनेटचा फायदा घेऊ शकतात. मोफत इंटरनेट डेटा आणि टॉकटाईम दोन दिवसांसाठी असतील. तसेच ज्या पोस्टपेड ग्राहकांची बिल भरण्याची तारीख जवळ आली आहे, त्यांची तारीख पुढे ढकलण्यात येईल.