Realme 14 Pro Series: प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Realme ने अलीकडेच भारतीय बाजारपेठेत Realme 14x 5G लाँच केला आहे. दरम्यान, कंपनी आता Realme 14 Pro सिरीज लाँच करण्याच्या तयारीत आहे. या सिरीज अंतर्गत Realme 14 Pro, Realme 14 Pro+ आणि Realme 14 Pro Lite यांचा समावेश असू शकतो. एवढेच नाही तर, या सिरीजशी संबंधित टीझरही रिलीज करण्यात आला आहे. यातून हँडसेटमध्ये सापडलेले प्रोसेसर आणि कॅमेरा लेन्स उघड झाले आहेत. आता आगामी फोनची पहिली झलक दाखवण्यात आली आहे आणि प्रगत बॅक-पॅनल समोर आले आहे. जाणून घेऊयात सविस्तर-
स्मार्टफोन ब्रँड Realme च्या मते, Realme 14 Pro Series ला जगातील पहिले बॅक-पॅनल मिळणार आहे. ज्याचा रंग बाहेरील तापमानानुसार बदलेल. सविस्तर बोलायचे झाल्यास, जेव्हा तापमान 16 अंशांनी कमी होते, तेव्हा फोनचा रंग पर्ल व्हाइट ते व्हायब्रंट ब्लू होईल. तसेच, तापमान वाढल्यावर बॅक-पॅनल पुन्हा ब्लुपासून पर्ल व्हाईट होईल. “या रंग बदलणाऱ्या बॅक-पॅनलमध्ये प्रगत ‘थर्मोक्रोमिक’ पिगमेंट्स आहेत, जे तापमानातील बदलांवर प्रतिक्रिया देतात. यासाठी कंपनीने ‘व्हॅल्युअर डिझायनर्स’सोबत भागीदारी केली आहे.”, अशी माहिती कंपनीने दिली आहे.
Realme कडून अद्याप Realme 14 Pro सीरीज लाँच करण्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. परंतु, लीक्समध्ये असे सांगितले जात आहे की, ही स्मार्टफोन सीरीज जानेवारी 2025 मध्ये लाँच होऊ शकते. ही सिरीज मिड प्रीमियम बजेटमध्ये लाँच केली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
टिझरनुसार, Realme 14 Pro मालिकेत मोठा गोल आकाराचा कॅमेरा मॉड्यूल उपलब्ध असेल. यात तीन कॅमेरा लेन्स आहेत. यामध्ये मॅजिक ग्लो नावाचे तीन फ्लॅश लाइट्स देखील लावण्यात आले आहेत. डिव्हाइसेसना IP69 पर्यंत रेटिंग मिळेल. तर, आतापर्यंत समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की, Realme 14 Pro सीरीजमध्ये क्वाड-कर्व डिस्प्ले प्रदान केला जाईल. या लाइनअपमध्ये येणाऱ्या फोनमध्ये Qualcomm चे Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर असू शकते.