दाक्षिणात्य अभिनेता धनुष सध्या चर्चेत आहे. धनुषच्या कामाची नेहमीच प्रशंसा केली जाते, पण आता तो साऊथ सिनेमातून हॉलिवूडमध्ये धमाल करायला सज्ज झाला आहे. धनुष प्रसिद्ध अॅव्हेंजर्स दिग्दर्शक जोडी रुसो ब्रदर्स दिग्दर्शित 'द ग्रे मॅन' या चित्रपटाद्वारे हॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. अभिनेत्याचा पहिला हॉलीवूड चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे, जो एक ऍक्शन आधारित चित्रपट आहे. धनुषच्या या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे त्याचे बजेट होय. 'द ग्रे मॅन' हा नेटफ्लिक्सचा सर्वात महागडा ऍक्शन चित्रपट ठरला आहे.
हे सुद्धा वाचा : ग्रेट Jio प्लॅन : 230 रुपयांमध्ये दररोज 2.5GB डेटा, कॉलिंगसह मिळेल Disney + Hotstar सबस्क्रिप्शन
धनुषच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अँथनी आणि जो रुसो यांनी केले असून, या चित्रपटाच्या निर्मितीचे कामही या दोघांनीच केले आहे. या चित्रपटाचे बजेट 200 मिलियन डॉलर आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी एकूण 1600 कोटींचा खर्च आला आहे. चित्रपट उत्कृष्ट बनवण्यासाठी अँथनी आणि जो रुसो यांनी खास ठिकाणी शूटही केले आहे.
अँथनी आणि जो रुसो यांनी या चित्रपटातील प्रत्येक छोट्या गोष्टीची काळजी घेतली आहे, ज्यामुळे चित्रपटाचा एक ऍक्शन सीन करण्यासाठी एक महिना लागला. या चित्रपटात अनेक हायटेक ऍक्शन सीन्सचा समावेश करण्यात आला आहे. त्याबरोबरच, चित्रपटात एक दृश्य आहे, ज्यात हॉलिवूड अभिनेता रायन गॉसलिंगला मारेकरी सैन्याशी लढताना दाखवले आहे. हा सीन शूट करण्यासाठी 40 मिलियन डॉलर म्हणजेच 319 कोटी रुपये इतका खर्च आल्याचा दावा केला जात आहे.
'द ग्रे मॅन' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर 22 जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट अमेरिकेतील काही चित्रपटगृहातही प्रदर्शित होणार आहे. धनुष व्यतिरिक्त चित्रपटात रायन गोसलिंग, ख्रिस इव्हान्स, ऍना डी आर्मास आणि रेगे जॉन पेज देखील आहेत. काही काळापूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. ट्रेलरमधील धनुषच्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.