रिलायन्सने आज आपली 47 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. या AGM दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. त्यामध्ये नवे AI तंत्रज्ञान Jio Brain सादर करण्यात आले आहे. तर, कंपनीने क्लाउड स्टोरेज आणि AI-चालित सेवा Jio वापरकर्त्यांसाठी अधिक सुलभ बनविण्याचे उद्दिष्ट ठेवत नवीन Jio AI-Cloud वेलकम ऑफर देखील जाहीर केली.
मुकेश अंबानी यांनी AGM दरम्यान सांगितले की, आम्ही यावर्षी दिवाळीपासून Jio AI-Cloud वेलकम ऑफर लाँच करण्याचा विचार करत आहोत. याद्वारे एक शक्तिशाली आणि परवडणारे समाधान मिळेल, जिथे क्लाउड डेटा स्टोरेज आणि डेटा-चालित AI सेवा सर्वत्र उपलब्ध असतील. त्यांनी सांगितले की, जगभरातील 8% ग्लोबल मोबाईल ट्रॅफिक Jio कडे आहे. दरम्यान, परवडण्यायोग्य असल्यामुळे, जिओच्या सेवा प्रत्येकासाठी उपलब्ध आहेत.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले की, “आज मी घोषणा करत आहे की, Jio वापरकर्त्यांना त्यांचे सर्व फोटो, व्हिडिओ, दस्तऐवज, इतर सर्व डिजिटल सामग्री आणि डेटा सुरक्षितपणे संग्रहित आणि ऍक्सेस करण्यासाठी 100 GB पर्यंत मोफत क्लाउड स्टोरेज मिळेल. ज्यांना जास्त स्टोरेजची गरज आहे, त्यांच्यासाठी आमच्याकडे बाजारातील सर्वात वाजवी किंमती असतील.”
AGM दरम्यान अंबानी यांनी सांगितले की, रिलायन्स गुजरातमधील जामनगरमध्ये गिगावॅट-स्केल, AI-रेडी डेटा सेंटर तयार करेल. याशिवाय, अत्याधुनिक AI कार्यक्रम विकसित करण्यासाठी Jio संस्थेसोबत भागीदारी केली आहे. तर, मुकेश अंबानी यांचे मत आहे की, AI सेवा लक्झरी नसून प्रत्येक उपकरणावर प्रत्येकासाठी AI तंत्रज्ञान उपलब्ध असले पाहिजे.