चेन्नईमध्ये गेल्या काही दिवसांपासून होणा-या जोरदार पावसामुळे येथे पूरमय परिस्थिती निर्माण झाली असून, येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे येथील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. मात्र ह्या गंभीर परिस्थितीत अनेक टेलिकॉम कंपन्या चेन्नईतील नागरिकांच्या मदतीसाठी धावून आल्या.
त्यातच आता आलेल्या बातमीनुसार, मोबाईल ऑपरेटर कंपनी MTS ने सुद्धा चेन्नईतील नागरिकांच्या मदतीसाठी पुढे आली आहे. खरे पाहता, MTS ने तमिळनाडूतील ग्राहकांच्या मदतीसाठी सेवा सुरु केली आहे. MTS ने घोषणा केली आहे की, तमिळनाडू भागातील ग्राहकांना ३ दिवसांसाठी 1GB चा मोफत डेटा देणार. ह्या सुविधेचा उपयोग प्रीपेड आणि पोस्टपेड हे दोन्ही ग्राहक करु शकतात. ह्याच्या माध्यमातून पूराशी लढत असलेल्या लोकांना आपल्या परिवाराशी आणि मित्रांशी जोडण्यास बरीच मदत होईल.
MTS ह्या सुविधेच्या माध्यमातून तमिळनाडूमध्ये MTS ग्राहक मोफत डेटाचा वापर करुन ईमेल पाठवण्यासोबत सोशल मिडिया प्लेटफॉर्म जसे व्हॉट्सअॅप, ट्विटर आणि फेसबुकच्या माध्यमातून जोडलेले राहू शकतात.
त्याचबरोबर चेन्नई सर्कलमध्ये लँडलाईन कॉल्ससुद्धा आठवड्याभरासाठी मोफत केले आहेत. तसेच असे टेलिफोन ग्राहक ज्यांची थकबाकी अजून राहिली आहे, त्यांचे कनेक्शन पुढील १५ दिवसांसाठी तोडण्यात येणार नाही. ह्यासंदर्भात सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी BSNL ने माहिती दिली आहे की, ती इतर BSNL मोबाईल फोनवर मोफत स्थानीय आणि STD कॉल्सची सुविधा देईल. त्याचबरोबर आपल्या प्रीपेड ग्राहकांना ७ दिवसांसाठी 100MB डेटा मोफत देईल.
ह्याआधी पेटीएम, वोडाफोन आणि एअरटेलनही चेन्नईतील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक मोफत सेवा आणि अन्य सेवा सुरु केल्या आहेत.