आपल्या देशात आधार कार्ड म्हणजे प्रत्येक नागरिकाचे सरकारी ओळख पत्र आहे. सरकारी ते खाजगी कामात ओळखपत्र म्हणून आधार कार्ड दाखवणं आता बंधनकारक झालं आहे. आधार कार्डशिवाय अनेक ठिकाणी आपलं काम होत नाही. पण आधार कार्डचा गैरवापरही अनेकदा केला जातो. त्यामुळेच आधार कार्डबाबत काही कडक नियम सरकारकडून जारी करण्यात आले आहेत.
केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी आधार कार्डबाबत मोठा इशारा दिला होता, तो मागे घेण्यात आला आहे. सरकारने लोकांना आधार कार्डची फोटोकॉपी शेअर करू नका. कारण, त्याचा गैरवापर होऊ शकतो असा सल्ला दिला होता. काही दिवसांपूर्वी जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटले होते की, केवळ UIDAI कडून परवाना मिळालेल्या संस्थाच एखाद्या व्यक्तीच्या ओळखीसाठी आधारचा वापर करू शकतात.
सरकारने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात असे म्हटले आहे की, हॉटेल्स किंवा फिल्म हॉल सारख्या खाजगी संस्थांना आधार कार्डच्या प्रती ठेवण्याचा अधिकार नाही. सरकारने लोकांना फोटोकॉपीऐवजी मास्क्ड आधार वापरण्यास सांगितले होते.
UIDAI कडे आधारचे एक विशेष वर्जन आहे, ज्याला मास्क्ड आधार कार्ड म्हटले जाते. आधारचा गैरवापर टाळण्यासाठी या कार्डचा वापर केला जातो. आधारची ही आवृत्ती आधार कार्ड सुरक्षित करते, तसेच तुमच्या ई-आधारमध्ये तुमचा नंबर मास्क करते, म्हणजेच फक्त शेवटचे 4 अंक दाखवते. UIDAI नुसार, मास्क्ड आधार क्रमांक म्हणजे आधार क्रमांकाचे पहिले 8 अंक xxxx-xxxx असे असतील, तर आधार क्रमांकाचे फक्त शेवटचे 4 अंक दिसतात.
1. https://myaadhaar.uidai.gov.in/ वर जा
2. तुमचा आधार कार्ड क्रमांक टाका.
3. 'डू यू वॉन्ट अ मास्क आधार' या ऑप्शन वर क्लिक करा.
4. डाउनलोड वर क्लिक करा.
मात्र, मास्क्ड आधार कार्डच्या माहितीचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो, असं लक्षात आल्याने हे निवेदन तातडीनं मागे घेण्यात आलं आहे, असं PIBच्या जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट झालं आहे.