वर्षातील सर्वात बहुप्रतीक्षित दिवाळी 2024 सणाला अवघ्या काही दिवसांचा अवधी उरला आहे. सध्या अनेक टेक कंपन्यांनी तसेच Flipkart आणि Amazon सारख्या प्रसिद्ध इ-कॉमर्स साईटवर देखील दिवाळी आणि सणासुदीनिमित्त सेलचे आयोजन केले गेले आहे. तसेच, अनेक सोशल मीडिया पेजेसवरून देखील शॉपिंग करता येईल. वेळेच्या अभावामुळे घरी बसून Online Shopping करणे सोपे होते. मात्र, लक्षात घ्या की, ऑनलाइन शॉपिंग करताना काही खबरदारी घेणे आवश्यक आहे.
तुमच्या माहितीसाठी सांगतो की, ऑनलाइन सेल सुरू होताच स्कॅमर देखील ऍक्टिव्ह होतात. तुमच्यापैकी अनेक युजर्स शॉपिंग करताना ऑनलाईन पेमेंट करण्यास प्राधान्य देतात. जेणेकरून, घरी आल्यावर कॅश देण्याची गरज उरत नाही. मात्र, ऑनलाईन पेमेंट करताना तसेच ऑनलाईन शॉपिंग करताना तुमच्या एका छोट्याशा चुकीमुळे तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. ऑनलाईन शॉपिंग करताना पुढील गोष्टींची आवर्जून काळजी घ्या.
सर्वप्रथम तुम्ही ज्या साइटवरून ऑनलाईन शॉपिंग करणार आहात, त्या साइटचे URL तपासून घ्या. जसे की, Amazon साइटचे नाव amazon.in आहे, परंतु स्कॅमर amazon.in किंवा तत्सम नाव असलेली साइट तयार करू शकतात, जी अगदी Amazon साईटसारखी दिसेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, साइटच्या समान डिझाइनमुळे लोक URL वर लक्ष देत नाही.
वर सांगितल्याप्रमाणे, घोटाळेबाज हुशारीने एक डमी साइट डिझाइन करतात. जी अगदी मूळ साइटसारखीच दिसेल. साइट तयार केल्यानंतर ते लोकांना मोठ्या सवलतीचे आमिष दाखवतात. तुम्ही घोटाळेबाजांच्या जाळ्यात पडताच आणि वस्तू खरेदी करण्यासाठी पैसे भरताच तुमची फसवणूक होईल. अशाप्रकारे तुमचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.
फेस्टिव्ह सेल सुरु होताच स्वस्त आणि बंपर सवलतीच्या उत्पादनांच्या फॉरवर्ड केलेल्या लिंक्स सोशल मीडियावर सर्वत्र दिसतात. तसेच, तुमच्या एखादा मित्र चांगली डील बघितल्यास तुम्हाला शेअर करतो. अशाप्रकारे तीच लिंक सगळीकडे फॉरवर्ड होत असते. अनेकजण जवळच्या लोकांनी पाठवलेल्या लिंकवर विश्वास ठेवतात आणि शॉपिंग करतात. यासह तुमची बँक खाती सहज रिकामी होतात. प्रत्येक लिंक बनावट असेल, असे नाही. परंतु, कृपया दुसरीकडून आलेल्या लिंकवर क्लिक करण्यापूर्वी त्याबाबत पळताळणी नक्की करा.