सध्या इंटरनेटची गरज एवढी वाढली आहे की, प्रत्येक घरात इंटरनेट कनेक्शन असल्याचे बघायला मिळत आहे. जर तुमच्या घरीही ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन असेल आणि तुम्हाला चांगला स्पीड मिळत नसेल, तर कंपनीकडे तक्रार करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या राउटरची स्थिती तपासणे आवश्यक आहे. राउटर चुकीच्या ठिकाणी ठेवल्यामुळे कनेक्टिव्हिटीच्या समस्या नेहमी उद्भवतात. आजच्या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला Wi-Fi राउटरच्या सर्वोत्तम स्थितीबद्दल सांगणार आहोत. त्याबरोबरच, बेस्ट सिग्नल मिळवण्यासाठी काही विशेष टिप्स देखील देणार आहोत. बघा सविस्तर-
हे सुद्धा वाचा: Amazon Extra Happiness Days चा आज शेवटचा दिवस! 50MP कॅमेरा स्मार्टफोन्स मोठ्या Discountसह स्वस्तात खरेदी करा
Wi-Fi राऊटर जमिनीवर ठेवणे टाळावे. तुम्ही टेबल किंवा तुमच्या शोकेसमध्ये राउटरची जागा निश्चित करू शकता. तसेच, Wi-Fi राउटरच्या मार्गात कोणताही अडथळा येत नाही याची खात्री करा. कारण, यासह बरेच वायर्स कनेक्टेड असतात. या वायर्सना सुद्धा धक्का लागल्यास सिग्नलमध्ये अडथडा येऊ शकतो. म्हणून राउटर खाली ठेऊ नका.
राउटर अशा ठिकाणी ठेवू नका जिथे आधीच भरपूर वस्तू ठेवलेल्या आहेत. लक्षात ठेवा की, वाय-फाय राउटरजवळ कोणत्याही धातूच्या वस्तू नसाव्यात, कारण त्याचा सिग्नलवर परिणाम होतो. यामुळे तुमच्या कामांत नेहमीच अडथळा येण्याची भीती असते. त्यामुळे राउटर अशाच ठिकाणी ठेवा जिथे रिकामी जागा आहे किंवा कमी वस्तू आहेत.
सामान्यतः सर्व राउटरमध्ये बाहेरील बाजूला अँटेना स्थापित केलेले असतात, जे सिग्नल सुधारण्यासाठी समायोजित केले जाऊ शकतात. अनेक वेळा हे अँटेना वाकलेले असतात आणि ते सरळ केल्यावर सिग्नल व्यवस्थित येतात. जर तुमच्याकडे इंटरनेट सिग्नलमध्ये काही समस्या येत असेल तर तुमच्या राउटरचा अँटेना सरळ आहे की नाही, हे तपासून घ्या.
वाय-फाय राउटर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सजवळ ठेवू नका. टीव्ही, बेबी मॉनिटर, ब्लूटूथ हेडसेट, फ्रीज इत्यादी इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून राउटर दूर ठेवा. असे केल्याने, तुम्हाला पूर्वीपेक्षा चांगले सिग्नल मिळण्यास सुरुवात होईल.