Digital Arrest: सध्या आपण पाहतच आहोत की, भारतात ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत चालली आहे. लोकांना आपला बळी बनवण्यासाठी घोटाळेबाज हॅकर्स स्कॅमर्स अनेक नवीन पद्धतींचा वापर करतात. यापैकी एक पद्धत ‘Digital Arrest’ आहे, ज्याचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकप्रिय कार्यक्रम ‘मन की बात’च्या 115 व्या भागात केला होता. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी देशातील जनतेला सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. शिवाय, या स्कॅमपासून वाचण्यासाठी महत्त्वाच्या Tips देखील दिल्या आहेत. पाहुयात सविस्तर-
भारताचे आजी पंतप्रधान PM मोदींनी त्यांच्या लोकप्रिय ‘मन की बात’ कार्यक्रमादरम्यान सांगितले की, डिजिटल अरेस्ट खूप धोकादायक आहे. हे करण्यासाठी स्कॅमर्स लोकांची वैयक्तिक माहिती गोळा करतात. त्यानंतर हे घोटाळेबाज पोलिस, CBI, RBI आणि नार्कोटिक्स सारख्या मोठ्या विभागांचे अधिकारी म्हणून व्हिडिओ कॉल करतात. या फोन कॉल्समध्ये घोटाळेबाज पूर्ण आत्मविश्वासाने बोलतात आणि कायदेशीर कारवाईची भीती दाखवतात.
अशा प्रकरणांमध्ये सामान्य लोक घाबरून जातात आणि ते खरोखर अधिकारी आहेत, असे समजू शकतात. अशाप्रकारे सामान्य जनता त्यांच्या जाळ्यात येते आणि सामान्य नागरिक फसवणुकीचे बळी ठरतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, आतापर्यंत या प्रकाराला अनेक जण बळी पडले असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला अशा फसवणुकीपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. अजिबात घाबरू नका. ‘थांबा, विचार करा आणि कृती करा’ असे त्यांनी जनतेला सांगितले आहे. ते पुढे म्हणाले की, “शक्य असल्यास अशा प्रकारच्या कॉलचा स्क्रीनशॉट घ्या आणि तो रेकॉर्ड करा. कोणतीही एजन्सी धमकावत नाही, व्हिडिओ कॉलद्वारे चौकशी करत नाही किंवा पैशाची मागणी देखील करत नाही.”
त्याबरोबरच, जर तुम्ही पीडित असाल तर काळजी करू नका. सर्वप्रथम हेल्पलाइन क्रमांक 1930 वर किंवा cybercrime.gov.in पोर्टलवर तक्रार रजिस्टर करा. अशी प्रकरणे रोखण्यासाठी गृह मंत्रालय, IT मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग, आर्थिक व्यवहार विभाग (DEA), महसूल विभाग (DOR), रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आणि TRAI सतत कार्यरत आहेत.