देशात 5G मोबाईल सेवेची चाचणी यशस्वी झाली आहे, मात्र ही सुविधा सर्वसामान्यांपर्यंत कधी पोहोचणार? याबद्दल जाणून घेण्याची लोकांमध्ये खूप उत्सुकता आहे. या प्रश्नाचे उत्तर आता सरकारने दिले आहे. सरकारने देशातील सामान्य लोकांसाठी ही सेवा सुरू करण्याचा महिना आणि वर्ष दोन्ही सांगितले आहे.
केंद्रीय रेल्वे आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पॅरिस येथे आयोजित एका कार्यक्रमात याबाबत घोषणा केली. अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, मार्च 2023 पर्यंत भारतात 5G मोबाइल सेवा सुरू होईल. त्यांनी सांगितले की 5G स्पेक्ट्रमची लिलाव प्रक्रिया पुढील महिन्याच्या जुलै अखेरीस पूर्ण होईल. केंद्रीय मंत्री म्हणाले की, भारताने पहिली 4G सेवा स्वतः सुरू केली होती आणि आता 5G सेवा सुरू करण्याची तयारी सुरु आहे. हे यश मिळविणाऱ्या जगातील मोजक्या देशांपैकी भारत एक आहे. ही सेवा सुरू होण्यापूर्वी देशात पुरेसे नेटवर्क उभारले जातील.
अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, इंटरनेटच्या 5G सेवेचा मिड आणि हाय बँड टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हाइडर कंपन्या वापरतील. ही सेवा सुरू झाल्यानंतर देशातील डेटा स्पीड आणि क्षमता 4G पेक्षा 10 पटीने वाढणार आहे. ते म्हणाले की, 5G स्पेक्ट्रम लिलाव जुलैमध्ये संपल्यानंतर, सरकार टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर्सशी चर्चा करेल आणि ही सुविधा लवकरात लवकर सुरू करण्याची तयारी करेल. 5G स्पेक्ट्रमच्या लिलावाला दूरसंचार कंपन्यांकडून चांगला प्रतिसाद मिळेल आणि सरकारला या सेवेचा चांगला फायदा होईल, अशी आशा मंत्र्यांनी व्यक्त केली.
हे सुद्धा वाचा : भारीच की ! Infinix ने भारतात लाँच केला स्वस्त लॅपटॉप, किंमत 30 हजार रुपयांपेक्षा कमी
केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री म्हणाले की, भारताची युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) प्रणाली आपले यश दाखवत आहे. भारतात, एका महिन्यात 5.5 अब्ज म्हणजेच 5.5 कोटी UPI व्यवहार केले जात आहेत. जगासाठी हे एक मोठे आश्चर्य आहे. तंत्रज्ञान आणि आर्थिक सुधारणांच्या बाबतीत भारत कसा प्रगती करतोय, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. त्यांनी सांगितले की, आता भारताचे UPI आणि Rupay कार्ड फ्रान्स आणि त्याच्याशी संबंधित देशांमध्ये देखील वैध असेल. यासाठी NPCI आणि फ्रान्सच्या लिरा नेटवर्कसोबत करार करण्यात आला आहे.
ते म्हणाले की, जगात सर्वात जास्त नवीन स्टार्टअप्स आता भारतात सुरू होत आहेत. भारताच्या या कामगिरीची दखल घेत युरोपने त्याला स्टार्ट अप्सच्या बाबतीत वर्षातील सर्वोत्तम देश म्हणून घोषित केले आहे. जगाला आश्चर्य आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने येथे किती वेगाने स्टार्ट-अप सुरू करण्यासाठी एक इकोसिस्टम तयार केली आहे.