WhatsApp चे स्टेटस फीचर हे सर्वात लोकप्रिय फीचर आहे. या फीचरद्वारे यूजर्स त्यांचे खास क्षण फोटो, टेक्स्ट आणि Video च्या स्वरूपात शेअर करतात. आता युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. WhatsApp लवकरच हे फीचर अपडेट करण्याची तयारी करत आहे. या अपग्रेडेशनमुळे यूजर्स WhatsApp वर लांबलचक व्हिडिओ स्टेटस शेअर करू शकतील. याद्वारे युजर्स त्यांच्या रोजच्या ऍक्टिव्हिटीज सहज स्टेटसला अपलोड करू शकतील. यासह हे फिचर आणखी मजेशीर होणार आहे.
WhatsAppच्या आगामी फिचरवर लक्ष ठेवणारी साईट wabetainfo ने आपल्या अधिकृत X म्हणेजच ट्विटर अकाउंटवर रिपोर्ट शेअर केली आहे. या रिपोर्टमध्ये Google Play Store वर उपलब्ध अपडेटवरून WhatsApp स्टेटस टाइम लिमिट वाढवणार असल्याचे समोर आले आहे. युजर्स लवकरच प्लॅटफॉर्मवर 30 सेकंदांऐवजी संपूर्ण 1 मिनिटाचा व्हिडिओ शेअर करू शकतील.
रिपोर्टमध्ये सांगितले गेले आहे की, WhatsApp ने युजर्सची मागणी लक्षात घेऊन स्टेटस मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. एका मिनिटाच्या कालावधीसह वापरकर्ते प्लॅटफॉर्मवर संपूर्ण व्हिडिओ एडिट न करता शेअर करू शकतात. सध्या या फिचरची टेस्टिंग सुरू आहे आणि बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध आहे. येत्या काही दिवसांत हे अपडेटेड फीचर Android आणि iPhone वापरकर्त्यांसाठी आणले जाईल, अशी अपेक्षा आहे.
WhatsApp UPI QR कोडबद्दल अलीकडेच माहिती पुढे आली आहे. नव्या फिचरद्वारे युजर्स प्लॅटफॉर्मवर कोणताही QR कोड स्कॅन करून UPI पेमेंट करू शकतील. यापूर्वी, वापरकर्त्यांना एका प्रक्रियेद्वारे कोड स्कॅन करावे लागत होते. नव्या फिचरद्वारे युजर्सना चॅट लिस्टमधील QR कोड स्कॅन करून ऑनलाइन पेमेंट करता येईल.