WhatsApp आपले मोबाइल ॲप आणि वेब आवृत्ती सोयीस्कर बनवण्यासाठी एक नवीन फिचर लवकरच सादर करणार आहे. नव्या फिचरद्वारे वापरकर्ते चॅट लिस्टमधील QR कोड स्कॅन करून ऑनलाइन पेमेंट करू शकतील. यासाठी त्यांना WhatsApp वरून इतर ॲप्सवर जाण्याची गरज नाही. यामुळे वापरकर्त्यांचा वेळ वाचेल आणि नवीन फीचर देखील त्यांच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल, असा विश्वास WhatsApp ने दर्शविला आहे. यासह युजर्सचा App वापरण्याचा अनुभव देखील सुधारेल.
हे सुद्धा वाचा: Vodafone Idea New Plan: कंपनीने सादर केला 169 रुपयांचा नवीन प्लॅन, Disney+Hotstar सबस्क्रिप्शन Free
आगामी फिचरबद्दल माहिती wabetainfo या WhatsApp फीचर्सवर नजर ठेवणाऱ्या वेबसाइटकडून मिळाली आहे. वेबसाईटने आपल्या अधिकृत X म्हणजेच ट्विटर अकाउंटवर एक रिपोर्ट शेअर केला आहे. नवीन UPI QR कोड फीचर Google Play Store वर उपलब्ध Android 2.24.7.3 बीटा अपडेटमध्ये दिसले आहे. हे फीचर चॅट लिस्टच्या वरच्या बाजूला आहे.
लक्षात घ्या की, वापरकर्ते प्लॅटफॉर्मवर कोणताही QR कोड स्कॅन करून UPI पेमेंट करू शकतील. यापूर्वी, वापरकर्त्यांना कोड स्कॅन करण्यासाठी एक लांब प्रक्रिया फॉलो करावी लागत होती. नवे फिचर बीटा वापरकर्त्यांसाठी आणले गेले आहे. टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर, हे फिचर लवकरच Android आणि iOS सर्व वापरकर्त्यांसाठी जारी केले जाईल.
WhatsApp सध्या UPI पेमेंट व्यतिरिक्त पिन फीचर अपग्रेड करण्याची तयारी करत आहे. या अपग्रेडनंतर, वापरकर्ते ॲपमध्ये एकाच वेळी तीन ऐवजी पाच चॅट पिन करू शकतील. याआधी, हे फीचर चॅनलमध्ये सपोर्ट केले होते, जे तुमच्या आवडत्या चॅनेलला पिन करण्याची सुविधा देते. यासह येत्या काळात WhatsApp आपल्या युजर्सच्या सोयीसाठी अनेक फीचर्स सादर करण्याची अपेक्षा आहे.