WhatsApp सतत काही ना काही नवीन फीचर अपडेट घेऊन येत आहे. यावेळी, इन्स्टंट मेसेजिंग ऍपने वेब युजर्ससाठी एक अप्रतिम फिचर जारी केले आहे. मागे वेबसाठी दोन फीचर्स डेव्हलपमेंट टप्प्यात असल्याची माहिती मिळाली होती. यात एक ‘नवीन साइडबार’ आणि दुसरा ‘चॅट फिल्टर’ अशा फीचर्सचा उल्लेख करण्यात आला होता.
यापैकी, चॅट फिल्टर फिचर जारी केले गेले आहे. सध्या हे फिचर WhatsApp वेबची नवीनतम आवृत्ती वापरणाऱ्या काही बीटा वापरकर्त्यांसाठी आणले जात आहे. वेब वापरकर्त्यांना नवीन इंटरफेस देण्यासाठी तसेच चॅट मजेदार करण्यासाठी ही फीचर्स आणली जात आहेत. जाणून घेऊयात तपशीलवार माहिती-
WhatsApp च्या ऍक्टिव्हिटीज आणि आगामी फीचर्सवर लक्ष ठेवणारी वेबसाइट WABetainfo च्या ताज्या रिपोर्टमध्ये सांगितले गेले की, वेब व्हर्जनसाठी चॅट फिल्टर फीचर आणले जात आहे. पुढे आलेल्या अहवालानुसार, WhatsApp Web ची अपडेटेड आवृत्ती वापरणाऱ्या काही भाग्यवान बीटा वापरकर्त्यांसाठी नवीन चॅट फिल्टर्स आणले जात आहेत.
WABetainfo ने आपल्या अधिकृत X म्हणजेच ट्विटर अकाउंटवर माहिती दिली आहे की, नव्या फिचरच्या मदतीने वापरकर्त्यांना विविध प्रकारचे चॅट शोधणे सोपे होईल. कसे? ते बघुयात-
वरील पोस्टमध्ये दिलेल्या स्क्रीनशॉटनुसार, चॅट लिस्ट स्क्रीनच्या शीर्षस्थानी काही फिल्टर्स दिले आहेत. आता वापरकर्त्यांना All, unread, Contact and Groups फिल्टर निवडण्याचा पर्याय मिळणार आहे. म्हणजेच वापरकर्ते त्यांच्या सोयीनुसार यापैकी कोणतेही फिल्टर वापरून चॅट लिस्ट सहज कस्टमाइझ करू शकतात.
नावावरून तुम्हाला समजलेच असेल की, All फिल्टरमध्ये तुम्हाला सर्व चॅट्स दिसणार आहेत. Unread फिल्टर फक्त तुम्ही न वाचलेल्या चॅट्स दाखवेल. Contact फिल्टरमध्ये तुम्हाला फक्त तेच चॅट दिसतील ज्यांचे नंबर तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असतील. याशिवाय, अर्थातच Groups फिल्टर तुम्हाला फक्त ग्रुप चॅट्स दर्शवणार आहे. मात्र, लक्षात घ्या की, सध्या हे फिचर फक्त काही बीटा वापरकर्त्यांसाठी आहे. हे भविष्यातील अपडेट्ससह प्रत्येकासाठी रोलआऊट केले जाईल.