सरकारने गुरुवारी Aadhaar नियमात काही सुधारणा केल्या आहेत. नवीन नियमांनुसार, केंद्र सरकारने लोकांना नावनोंदणीच्या तारखेपासून दर 10 वर्षांनी किमान एकदा त्यांचे दस्तऐवज आणि आधार कार्ड माहिती अपडेट करण्याबद्दल सुचवले आहे. आता हे करणे आवश्यक का आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की, ही प्रक्रिया सेंट्रल आयडेंटिटी डेटा रिपॉझिटरी (CIDR) मधील माहितीची अचूकता सुनिश्चित करण्यास मदत करेल.
इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने जारी केलेल्या राजपत्रातील अधिसूचनेनुसार, "आधार कार्ड धारकाने आधारकार्डमध्ये नावनोंदणी केल्याच्या तारखेपासून दर 10 वर्षांनी, ओळखीचा पुरावा सादर करून आधारकार्डमध्ये किमान एकदा त्याचे सहायक दस्तऐवज अपडेट केले पाहिजेत. यामुळे CIDR मध्ये त्यांच्या माहितीची सतत अचूकता सुनिश्चित राहील."
कागदपत्रे अपडेट करण्याची प्रक्रिया अनिवार्य नसली तरी, लोकांना त्यांचे आधार दस्तऐवज अपडेट करण्याचा सल्ला दिला जातो.
UIDAI आधार कार्डसाठी POI म्हणजेच कागदपत्रे ज्यात एखाद्या व्यक्तीचे नाव आणि फोटो असतात, ते स्वीकारतात. पुरावा म्हणून सादर केल्या जाणाऱ्या ओळखीच्या कागदपत्रांमध्ये पासपोर्ट, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स आणि बरेच काही समाविष्ट आहे.
दस्तऐवज अपडेट करण्यासाठी, UDAI ने आधीच myAadhaar पोर्टल आणि myAadhaar ऍपवर 'अपडेट डॉक्युमेंट्स' हे एक फिचर जोडले आहे. याशिवाय, या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही कोणत्याही आधार नोंदणी केंद्राला देखील भेट देऊ शकता. नवीन सुविधेमुळे आधार कार्ड धारकांना POI आणि POA (नाव आणि पत्ता लिंक केलेले) दस्तऐवज अपडेट करून तपशील अपडेट करण्याची परवानगी मिळेल.
या तपशीलांच्या (नाव, पत्ता, जन्मतारीख, लिंग, मोबाइल नंबर, ईमेल) तसेच बायोमेट्रिक्स (फिंगर प्रिंट, आयरिस) वर आधारित इतर तपशील अपडेट करण्यासाठी तुम्ही सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टल (SSUP) मध्ये तुमचा पत्ता ऑनलाइन अपडेट करु शकता. या व्यतिरिक्त, तुम्ही नोंदणी केंद्रास देखील भेट देऊ शकता.